श्री. गोविंदस्वामी आफळे

अष्टपैलू कीर्तन सम्राट

राष्ट्रीय कीर्तन केसरी गोविंदस्वामी आफळे हे नाव कानी येताच एक आगळा वेगळा विलक्षण माणूस नजरेसमोर येतो. व्यायामाने कमावलेले धिप्पाड शरीर, उंच-निंच आकृती, काळा-सावळा रंग, राकट उग्र पण तरीही रेखीव रुबाबदार चेहरा, शुभ्र धोतर सदरा, काळा कोट आणि काळी टोपी, कीर्तनाचे वेळी भगव्या रंगाचा ऐटबाज फेटा, शाल या साऱ्या व्यक्तिमत्त्वाला शोभेसा पहाडी खडा आवाज !

सर्वसामान्य माणसापेक्षा अनेक बाबतीत ते निराळे होते. पारंपारिक पठडीतून बाहेर पडून राष्ट्रवीरांच्या, क्रांतिकारकांच्या कथा आणि शुद्ध हिंदुत्वनिष्ठ, विज्ञानवादी दृष्टीकोन ठेऊन, आजच्या ताज्या राजकारणाशी त्याचा योग्य सांधा जोडून ते प्रखरपणे दाखवणारे, अंधश्रद्धेवर कडक टीका करणारे आणि ज्यांच्या कीर्तनाला तरुण-बाल- वृद्धांची अलोट गर्दी खेचणारे असे त्यांच्या काळातले ते एकमेव कीर्तनकार होते असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. सिनेमा, रेडीओ, टी.व्ही. अश्या विविध माध्यमांमुळे कीर्तन हा प्रकार थोडा मागे पडू लागला होता. त्यात आफळे बुवांनी नवचैतन्य निर्माण केले. क्षणात हास्याचा खळखळाट तर क्षणात वीरश्री, गहिवर दाटेल असा करूण रस तर मिश्कील कोट्या अशाप्रकारे नवरसांचा उत्कट अविष्कार त्यांच्या कीर्तनातून होत असे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींच्या समाधीवर मंदिर बांधले. त्यात कीर्तनसेवा करण्यासाठी “आफळे” घराण्याला अंगापूर, जैतापूर, भोस, सांगवी, वडगाव, महागाव, माहुली, सोनगाव ह्या ८ गावांची जहांगीर दिली. फळ मिळेपर्यंत सतत प्रयत्न करणारे ते “आफळे” अशी आपल्या आडनावाची उत्पत्ती बुवा सांगत असत. सातारा जिल्ह्यातील क्षेत्र माहुली या कृष्णा काठच्या छोट्या गावात रहाणाऱ्या चिमुताई कडक स्वभावाच्या होत्या. ओळीने सात मुली झाल्या. मुलगा नाही म्हणून त्यांनी समर्थांच्या समाधीवर नवस केला – “मुलगा झाला नाही तर मी जहांगीर परत करीन,भिक्षा मागून नाही तर मी कष्ट करून निर्वाह करेन पण जावई सेवेला पाठवणार नाही. आपली सेवा आजपर्यंत घडली तशी पुढे घडावी अशी आपली इच्छा असेल तर मला मुलगा झाला पाहिजे.” अशा दृढनिश्चयी मातोश्रींच्या नवसाचं फळ म्हणजे गोविंद स्वामी! रामदासस्वामींच्या स्मृतीसाठी नावात “स्वामी” आहे.

जन्म – दासनवमी, ११ फेब्रुवारी १९१७

त्यानंतर बालवयातच तल्लख बुद्धीचं वरदान लाभलं, नकला, पोवाडे करणे, गाणी म्हणणे, कैऱ्या पाडणे, नदीत (मुद्दाम पूर आला असतानाही) पोहणे हे छंद तर आडदांडपणा आणि चक्क माऱ्यामाऱ्या! यामुळे घरी आईकडे वारंवारी तक्रारीही येत. नवसाचा मुलगा लाडामुळे बिघडू नये म्हणून चिमुताई फार दक्ष असत.

शिक्षणासाठी घर सोडून प्रथम हायस्कूलसाठी सातारा, नंतर मॅट्रीकसाठी पुणे येथे आले. पितृछत्र हरपलं होतं. धाकटी भावंडे होती. घरून मदत होण्यासारखी नव्हती तरी शिक्षणाच्या अदम्य इच्छेमुळे पडेल ते काम करून (झाड-लोट करणे, स्वयंपाक करणे, लोखंडी पत्रे कापणे, धुणी-भांडी, हमाली, मुले सांभाळणे, मंगळागौर जागवणे, चैत्रगौर मांडणे, टांगा हाकणे, म्हशी राखणे, इत्यादी), माधुकरी मागून, वार लावून, शिक्षण घेतले. त्याचवेळी कुस्तीही शिकले. पोवाडे, नाटक, मेळे यात काम करणे, उतबत्त्या विकणे कितीतरी छोटी-मोठी कामे केली. आणि १९४५ला बी.ए. ऑनर्स झाले.

पुण्यात हिंदुमहासभेने “केसरी” मधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर पोवाडे स्पर्धा घेतल्या. महाराष्ट्रातून शेकडो पोवाडे आले, त्यात गोविंदस्वामींच्या पोवाड्याचा प्रथम क्रमांक आला. (१९३८-३९) नंतर दादरला सावरकरांच्या घरी त्यांचे समोर त्यांचा पोवाडा विजयादशमीच्या दिवशी ऐकवावा हे भाग्य त्यांना लाभले. तसेच केसरीच्या कचेरीत सेनापती बापट यांच्या उपस्थितीत सुभाषबाबुंवरील पोवाडा सुभाषबाबुंसमोर सादर केला. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी प्रस्तावना लिहून तो प्रसिद्धही केली. गावोगाव त्यांचे कार्यक्रम गाजले आणि "शाहीर आफळे" या नावाने महाराष्ट्र त्यांना ओळखू लागला.

त्यांनी ११ चित्रपटांतून कामे केली, अनेक नाटकांतून काम केले. प्रभात चित्रपट संस्थेत “शेजारी” चित्रपटात ‘नईम’ची भूमिका त्यांना मिळाली होती पण आईने त्यांना त्या क्षेत्रातून बाहेर खेचले. हातात चिपळी दिली आणि “नभी जैसी तारांगणे तैसे लोक तुझ्या कीर्तनाला येतील” ह्या आशीर्वादासह कीर्तन करण्याची आज्ञा दिली. मातोश्रींचा आशीर्वाद फळला. बुवांच्या कीर्तनाला हजारोंनी गर्दी होई, रस्ते बंद होत. भावगीतांच्या काही रेकॉर्डसही त्यांच्या आवाजात निघाल्या. “सागरा प्राण तळमळला” हे सावरकर रचित गीत सर्वप्रथम HMV ने त्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केलेले आहे. (१९४८-४९)

विविध मासिकात, दैनिकात त्यांचे वेगवेगळ्या विषयांवर लेख प्रसिद्ध होत. १५ नाटके, २ कवितासंग्रह, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित “सावरकर गाथा” हे महाकाव्य त्यांनी रचले. त्याचे काव्यगायनाचे १०० प्रयोगही त्यांनी केले.

पहिले राष्ट्रीय कीर्तनकार दत्तोपंत पटवर्धन हे त्यांचे गुरु. श्री गोविंद बुवा देव यांचेकडे कीर्तन प्राथमिक शिक्षण-झांजा धरली. पुण्यात हरिकीर्तनोत्तेज सभेने आयोजिलेल्या “हिंसा-अहिंसा विवेक” या विषयावरील कीर्तन स्पर्धेत आफळे बुवांचा प्रथम क्रमांक आला. त्या संस्थेत ते पुढे बिनीचे कार्यकर्ते झाले. त्यांनी परिश्रमाने संस्था वाढविली. ३ प्लॉट सदाशिवपेठेत खरेदी केले. विठ्ठल रखुमाई, गणपती, श्रीमद वेद व्यास महर्षी आदि मूर्ती बसवल्या. स्वतःचे ९०१ रुपये देऊन देवर्षी नारदांची मूर्ती घडविली. स्वतःच्या पाठीवरून वाजत गाजत आणली. जगातले दुर्मिळ असे श्री नारद मंदिर बांधले. गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय म्हणून “श्री व्यास गुरुकुल” चालवले. ६-७ मुलांचे पदवीपर्यंतचे तर ६०/७० मुलांचे मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण त्यांनी केले. स्वतःच्या मुलाच्या यशाचे पेढे कोणीही वाटेल; पण गुरुकुलातील सांभाळलेला मुलगा ७१% गुण मिळवून मॅट्रीक झाला. यासाठी त्याची (चंद्रकांत बालाजी दामले) आणि गुरुकुलातील वजनदार विद्यार्थी (सुधाकर थत्ते) यांची नानांनी (आफळे बुवांचे घरगुती संबोधन) चक्क पेढे तुला केली. पुण्याच्या “महाराष्ट्र मंडळ” व्यायाम शाळेचे अध्वर्यू मा. श्री. कॅप्टन शिवरामपंत दामले (शिवाकाका) यांची रौप्य तुलाही बुवांनीच केली होती.

चेहरा उग्र असला तरी स्वभाव गमत्या होता, हळवाही होता. मन अगदी स्वच्छ, निरागस, कुणाचा कधी मत्सर, द्वेष, हेवा-दावा नाही. मनं परखड आणि स्पष्ट, पुन्हा ती निर्भीडपणे मांडण्याचं धाडसही त्यांना होतं.

He always said constructive and not destructive.

आपल्या धर्म – संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, पूर्वजांच्या यश-कीर्तीचा आत्यंतिक आदर अशा त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे त्यांची अनेकांशी मैत्री होती. सरोजिनी बाबर, यशवंतराव चव्हाणांपासून, सुशीलकुमार शिंद्यांपर्यंत त्यांचा स्नेह जुळला. प. पू. श्रीधरस्वामी, प. पू. शंकराचार्य, प. पू. धुंडामहाराज देगहुरकर यांसारख्या पुण्यवंतांचे आशीर्वाद आणि प्रेम त्यांना लाभले.

गांधींच्या आत्यंतिक अहिंसेच्या आग्रहामुळे हिंदुसामाजाचे आणि देशाचे कसे प्रचंड नुकसान झाले हे जाहीरपणे सांगायला ते कधी कचरले नाहीत तसेच पंडित नथुराम गोडसेंच्या स्मृतिदिनाला कीर्तन करायलाही कधी डरले नाहीत. त्यांच्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ आचार-विचारांमुळे त्यांना फार वेळा कारावास, कीर्तनांवर बंदी, जिल्हाबंदी अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले तरी त्यांची निष्ठा आणि धैर्य अभंग राहिले.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे तर त्याचं दैवतच होतं जणू! सर्वच वीर हुतात्म्यांची, क्रांतीकारकांची चरित्रे कीर्तनात अत्यंत रंगून जाऊन ते सांगत असत. संपूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरची असंख्य गावं इतकच नव्हे तर अमेरिकेतही ते ३ महिने राहून कीर्तने गाजवून आले.

बडोदा येथे माणिकराव आखाड्यात १००० मुलींना त्यांनी रक्षाबंधनाचे निमित्ताने वाघनखे वाटली. (इतिहासात शिवरायांनी अफझलखानाचे पोट फाडायला वापरलेले शस्त्र) वडील, भाऊ, पती किंवा अन्य कोणीतरी येईल आणि आपलं रक्षण करील अशा विचारांनी मुलींनी दुबळं राहून चालणार नाही तर त्यांनी स्वसंरक्षणक्षम झालंच पाहिजे हा त्यामागचा विचार होता. याचा ते आग्रहाने प्रचार करीत. त्याच अनुषंगाने हिंदू मुलीवर अत्याचार करू पाहणाऱ्या एका अधम मुसलमान अधिकाऱ्याला ठार करणारा हिंदू युवक (बंगाली क्रांतिकारक) तरुण शशिमोहन हे त्या नरकासुराला मारून १६००० स्त्रियांना मुक्त करणाऱ्या श्रीकृष्णाचाच अंश आहे हे ते निर्भीडपणे सांगत असत.

१९५१ मध्ये दासनवमीला सकाळी ९ ते उत्तररात्री (पहाटे) ३ वाजेपर्यंत एका दिवसात वरळी, माटुंगा, चेंबूर, दादर, गिरगाव आणि लोखंडी जथा – १ दिवसात ६ कीर्तने असे अचाट “रेकॉर्ड” करणारे फक्त आफळे बुवाच! प्रत्येक कीर्तन २-२ १/२ तासाचे.

हिंदू संस्कारांवर त्यांचा फार लोभ होता. म्हणूनच हिंदूंच्या सर्व जातीतल्या लोकांना मौजीबंधनाचा अधिकार आहे, याचा प्रचार करून त्यांनी २१, ५१, १०८ अशा सामुदायिक मुंजी (सर्व जातीतल्या) अनेक वर्षे सातत्याने लावल्या. (अगदी कमी खर्चात) अक्षरशः हजारो मुंजी त्यांनी लावल्या असतील.

बुवांनी कार्यकर्त्यांची नेहमीच जाण ठेवली. आपल्या तबला-पेटी, वादक साथीदारांनाही घरातल्यांसारखी प्रेमाची वागणूक दिली. अमाप लोकप्रियता त्यांना लाभली. अगणित कष्ट, दुःख सोसून ते संकटं, प्रवाद, टीका यांना खंबीरपणे तोंड देऊन ठाम उभे राहिले. असंख्य शिष्य तयार केले. काही सहकाऱ्यांसह कीर्तन महाविद्यालयाची स्थापना केली. १० वर्षे आपल्या घरात ते चालवले. उदार हस्ताने विपुल दानधर्म केला, यज्ञ केले. शुद्धीकरणे करून अनेकांना हिंदुधर्मात घेतले. १४०० कीर्तनांची आख्याने त्यांनी स्वतः रचली.

अभ्यासाच्या बाबतीत ते फार आग्रही होते. स्वतः M.A. L.LB. ते Ph.D. च्या प्रबंधाची तयारी करत होते. आळस या शब्दाशी त्यांची ओळखही नव्हती. कसलेही व्यसन नव्हते. जन्मभर त्यांनी ज्ञानसाधना केली. थोडीफार योगसाधनाही ते करीत. ते अत्यंत रसिक होते. पण कधी कोणत्याही गैरसोईने कातावत नसत. आहे ते गोड मानून घ्यायचे, सापडेल तशी वाट शोधायची, मिळेल ती संधी साधायची, झेपेल तेवढे कार्य करीत रहायचे आणि पुढे निघायचे हा त्यांचा खाक्या होता.

आल्यागेल्याचं हसतमुखाने आदरातिथ्य करणारी, सर्व कार्यात मनापासून साथ देणारी, सुविद्य आणि स्वतः हिंदुमहासभेची धडाडीची कार्यकर्ती अशी डॉक्टर सुधा ही प्रेमळ पत्नी त्यांना लाभली होती. तिच्या आणि एका शिष्येच्या सहाय्याने “कीर्तन जुगलबंदी” हा कीर्तन प्रकार सर्वप्रथम आफळेबुवांनी रचला, बसवला आणि त्या दोघींकरता सादर केला. त्याला उदंड प्रतिसाद (१९७२-७३) मिळाला. (कीर्तन जुगलबंदी – दोघांनी विषय ठरवून वाद-विवाद, सवाल-जवाब सारखे विरोधी मत मांडणे, तशा कथा रंगवणे.)

“राजा, वैऱ्याची रात्र आहे, जागा राहा” असे हिंदुसमाजाच्या कानी कपाळी सतत ओरडत रहाणारा तो एक शाहीर होता. जागव्या होत्या. “उत्तिष्ठत, जागृत, प्राप्य वरान्नि बोधत’” असे जनजागरण करणारा तो एक नरेंद्र होता. आपल्या देशबांधवांना सतत धर्मशिक्षण देणारा आणि अमेरिकेत आपल्या धर्म-संस्कृतीचा ध्वज फडकवणारा आधुनिक विवेकानंद होता.

“मृत्तिकेचा जन्म माझा, आत गंगा अमृताची” अशी विनवणी करणारा आधुनिक तुकाराम बोवा होता. आणि “केल्याने होत आहे रे! आधी केलेची पाहिजे!” अशी आरोळी देणारा आणि त्याच विचारातून आयुष्यभर निष्काम कर्मयोग करणारा आधुनिक समर्थ रामदासही होता. १ नोव्हेंबर १९८८ या दिवशी त्यांनी या जगातून प्रस्थान केले.

अशा बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्वाचा शोध कितीही घेतला तरी तो उणाच वाटतो. गुण सांगावे तेवढे कमीच वाटतात. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!!!!